Monday, November 17, 2014

शिवसेनेचे धरसोडीचे राजकारण, कोलांटउड्या आणि वैचारिक गोंधळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनेने संधीसाधूपणाचे आणि सुडाचे राजकारण चालविले आहे. कोणतीही ठाम राजकीय भूमिका नाही अथवा विचारसरणीही नाही. खरे तर याच्यामध्ये मला काय मिळणार, अशीच विचारसरणी आहे. गेल्या काही दशकात महाराष्ट्राने अशा प्रकारचे राजकारण पाहिले नाही.

भारतीय जनता पार्टी – शिवसेनेची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार आहे. एका जागेवरसुद्धा तडजोडीस तो पक्ष तयार नव्हता. आम्ही केवळ 119 जागा स्वीकाराव्यात असा त्यांचा आग्रह होता पण प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या. त्यांना स्वतःला 170 – 171 जागा ठेवायच्या होत्या पण निवडणुकीत मात्र त्यांना फक्त 63 जागांवर विजय मिळाला. इतका दारूण पराभव झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या नेतृत्वाने जनतेचा मूड समजून घ्यायला नकार दिला.

निकालाच्या दिवशी सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दोन दोन तासातच स्पष्ट केले की, शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. भाजपाला बहुमत मिळाले नाही आणि युती करावी लागली तर आमची स्वाभाविक निवड शिवसेनाच असेल अशी आमची स्पष्ट भूमिका होती. पण आमच्या भूमिकेला प्रतिसाद देतानाही शिवसेनेची भूमिका हास्यास्पद होती. मुख्यमंत्रिपद देऊ केले तरच युतीचा विचार करू असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत 65 पेक्षाही कमी जागा मिळाल्यानंतरसुद्धा त्यांची अशी भूमिका होती.

त्या दिवसापासून शिवसेनेने द्वेषाचे राजकारण केले. कधी मोदीजींच्या वडिलांचा उल्लेख केला तर कधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना औरंगजेब अथवा अदिलशाह म्हटले. शक्य त्या प्रत्येक मार्गाने त्यांनी आम्हाला अपमानित केले. तरीही आता त्यांना आमच्याकडून राज्य सरकारमधील महत्त्वाची खाती आदरपूर्वक हवीत. आम्ही अफझलखान आणि आदिलशाह असू तर शिवसेना आमच्या सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक का आहे ?

सत्तेच्या आकांक्षेने ते पुरते आंधळे झाले आहेत. मतदारांनी झिडकारले तरीही आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहोत, असे वलय स्वतःभोवती निर्माण करत आहेत. त्याचा अलिकडचा प्रकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत आमची भूमिका काय आहे, असा जाब विचारणे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कधीही मागितला नाही त्यामुळे आम्ही याबाबतीत खुलासा करण्यासारखे काही नाही. जेव्हा आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला त्यावेळी आम्ही केवळ अपक्षांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला होता व राष्ट्रवादी काँग्रेस कोठे चित्रातच नव्हती. एकतर शिवसेनेला हे समजत नाही किंवा हे समजून न घेताच तो पक्ष आमची बदनामी करत आहे. राजकीय परिपक्वता नसल्याचेच हे लक्षण आहे.

खरे तर गेले तीन चार दिवस शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर मागच्या दाराने संपर्क साधत सरकार स्थापन करण्यासाठी गुप्तपणे चाचपणी करून पाहिली. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसबरोबर हातमिळवणीचा प्रयत्न केला पण काँग्रेसनेच त्यांना नकार दिला. आता ते हाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर करू पाहत आहेत. पण बहुमताचे साधे अंकगणित तरी त्यांना कळते का ?

शिवसेनेचे नेतृत्व केवळ द्वेषाच्या आणि मत्सराच्या राजकारणात गुंतलेले आहे. एकीकडे ते महाराष्ट्राच्या हिताच्या गप्पा मारतात पण राज्याला स्थिर सरकार देण्याचा त्यांनी एकदाही विचार केला नाही. शिवसेनेच्या तर्कानुसार भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली तो मतदारांचा विश्वासघात आहे. पण जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर मात्र ते महाराष्ट्राच्या हितासाठी असते. या दुटप्पीपणाचे ते काय स्पष्टीकरण देणार आहेत ? कधी स्पष्टीकरण देतील काय याची मला शंका आहे.

ज्या शरद पवारांच्या विरोधात तुम्ही इतकी गरळ ओकली आणि त्यांना हिंदुत्वाचा शत्रू ठरवले तसेच त्यांनी भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग करून हिरव्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही तुम्ही केलात ते अचानक तुमचे मित्र कसे झाले ? शरद पवारांबद्दल अवघ्या चोवीस तासात इतके मतपरिवर्तन कसे झाले ?

शिवसेनेचे राजकारण हे पूर्णपणे संधीसाधूपणाचे, दबावाचे आणि वैचारिक धरसोडीचे आहे. ते त्यांना भविष्यात महागात पडलेच पण त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक दुर्दैवी आणि धोकादायक पायंडा पडणार आहे.

No comments:

Post a Comment