Monday, December 1, 2014

नवे मन्वंतर


भाजपाची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. १ नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सदस्यत्व स्वीकारले आणि मोहीम सुरू झाली. गेल्या एक महिन्यात देशभरात एक कोटी सभासद नोंदणी झालेली आहे. यापूर्वीची सभासद नोंदणी सहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी देशात तीन कोटी सभासद नोंदवले गेले होते. यावेळची सभासद नोंदणी सर्व अर्थाने वेगळी आहे. गेली साठ वर्षे वापरात असलेली पद्धती बाजूला ठेवून भाजपाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत सभासद नोंदणीची नवी पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या राजकीय जीवनातील हा एक अनोखा प्रयोग आहे. आणि या प्रयोगामुळे केवळ भाजपाच नव्हे तर भारताच्या राजकारणातील सर्व राजकीय पक्षांना आपली कार्यपद्धती बदलावी लागेल, एवढा दूरगामी परिणाम करणारा हा प्रयोग आहे.

आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने नोंदणी करताना पक्षाचे कार्यकर्ते लोकांकडे जात असत किंवा लोकांकडे गेलो होतो असा आभास तरी निर्माण करत असत. यावेळी भाजपाने स्वीकारलेल्या पद्धतीत कार्यकर्ते लोकांकडे जातीलच पण पक्षाचे सभासदत्व घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला थेट सभासदत्व घेता येईल, जे पारंपरिक पद्धतीत फारसे सोपे नव्हते. हे एक नवे वळण या पद्धतीने दिले. सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहन जनतेला केल्यानंतर एक नोव्हेंबरला काही तासांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून साडेसात लाखाच्या वर नोंदणी झाली हा एक अनोखा अनुभव होता.

१९५१ साली जनसंघ स्थापन झाला तेव्हा त्या जनसंघाचे सभासदत्व स्वीकारायला कोणीच तयार नव्हते. तो काळ अवघड होता. महात्मा गांधी यांचा खून झाला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ताजा होता. त्या आंदोलनात सहभागी असलेली काँग्रेसच्या नेतृत्वाची पिढी सर्व पातळीवर नेतृत्व करत होती. नेहरूंचे उत्तुंग नेतृत्व होते. त्यामुळे कोणताही नवा विचार आणि त्यातही ज्याच्या तोंडावर गांधी खुनाचे काळे फासण्याचा प्रयत्न झाला असा विचार जनतेपर्यंत घेऊन जाणे हेच सर्वात मोठे धाडस होते. त्यामुळे १९५१ ची परिस्थिती तर कल्पनेच्या पलिकडची होती. पण भारतीय जनता पार्टी १९८० साली स्थापन झाली तेव्हाची परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. १९७० च्या दशकात राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू झालेले विद्यार्थ्यांचे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशजींचे नेतृत्व, आणीबाणीच्या विरोधातील संघर्ष आणि जनता पार्टीचे अल्पजीवी सरकार यामुळे पूर्वाश्रमीच्या जनसंघाची राजकीय अस्पृश्यता संपलेली होती. पण म्हणून विचार प्रतिष्ठित झाला होता, विचारांची स्वीकारार्हता वाढली होती, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. जनता पार्टीतून बाहेर पडून भाजपाची स्थापना केल्यानंतर पुनःश्च हरीओम म्हणत एका अर्थाने शून्यातूनच सुरुवात केली होती.

१९८० पासून २००९ पर्यंत वेगवेगळे प्रयोग करत वेगवेगळी आंदोलने करत पक्ष वाढविण्याचा, पक्षाचा पाया विस्तारत नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. त्या प्रयत्नांना यश मिळाले खरे, पण ते नाही म्हटले तरी मर्यादित होते. एक तर देशाच्या सर्व भागात पक्ष बळकटपणे उभा राहिला नाही. दक्षिणेतील तीन प्रांत आणि पूर्व – पूर्वोत्तर भारत यात पाय रोवण्यात पक्षाला याही काळात यश मिळत नव्हते हे नाकारण्याचे कारण नाही. २०१२ नंतर देशातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत गेले. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड असे काही मोठे प्रदेश आम्ही सातत्याने जिंकले. या प्रदेशांमधील आमच्या सरकारांनी खरोखरच प्रभावी कामगिरी करून दाखवली. विशेषतः संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोसळत असताना व विकासाचा गाडा अडचणींमध्ये रुतलेला असताना या तीन राज्यांनी शेती, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात चालवलेली प्रगती ही स्वाभाविकपणे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली. संपूर्ण देशात विशेषतः केंद्रात व महाराष्ट्रात राजकीय भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणे पुढे येत असताना भाजपाशासित तीन राज्यांमध्ये म्हणण्यासारखा भ्रष्टाचार नाही, हेही जनतेच्या लक्षात येत होते. या सगळ्यातून सर्वसमावेशक विकासासाठी लागणारा चांगला राज्य कारभार करण्याची कुवत भाजपामध्ये आहे, असे एक जनमानस बनत गेले. त्याच्या जोडीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाला. अनंत अडचणी व प्रखर विरोध या सगळ्यांना तोंड देत देत त्यांनी गुजरातची जी प्रगती करून दाखवली, ती देशभर आकर्षणाचा विषय झाली. अन्य सर्व राजकीय नेतृत्वाच्या तुलनेत नरेंद्र मोदींचा ठसा अधिक प्रभावीपणे उमटायला लागला. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची स्विकारार्हता अकल्पित वेगाने वाढू लागली. पूर्वी दारोदार जाऊन सुद्धा सभासद मिळत नव्हते. त्याच्या उलटा प्रवाह सुरू झाला. लोक आपणहून पक्षाच्या कार्यालयात येऊन सभासदत्व मागू लागले.

१९४७ नंतरचा पाच सात वर्षांचा कालखंड असा होता की, लोक आपणहून काँग्रेसचे सभासदत्व मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पश्चिम बंगाल, केरळमध्ये काही काळ कम्युनिस्टांच्या बाबतीत हे घडत होते व अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर दिल्लीसारख्या शहरामध्ये आम आदमी पार्टीबद्दल असे आकर्षण अल्पजीवी का होईना पण निर्माण झाले होते. पण देशाच्या कानाकोपऱ्यातून आज भाजपाला मिळत असलेला प्रतिसाद हा सर्वस्वी वेगळा आहे. त्याची तूलना फार तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेसबद्दल असलेल्या आकर्षणाशीच करता येईल. चाळीसच्या दशकामध्ये स्वराज्य मिळविण्यासाठी जनता काँग्रेसबरोबर होती. आता सत्तर वर्षानंतर समर्थ, संपन्न आणि आत्मनिर्भर समाज निर्माण करण्याची आकांक्षा बाळगणारी जनता सुराज्य व चांगल्या राज्यकारभाराच्या अपेक्षेने भाजपाबरोबर येत आहे. भाजपाची सध्या सुरू असलेली सभासदनोंदणी व तिला मिळणारा प्रतिसाद नव्या मन्वंतराचा निदर्शक आहे.